तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत, भाव नसल्याने शेतकऱ्यांवर आली वाईट वेळ

करमाळा | तालुक्यातील बागायती भागात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांचा कांदा काढणीला आला आहे. मात्र दर नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचे दिसत आहे.
यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भरमसाठ खते घालून, कांद्यात मोठी गुंतवणुक केली आहे.
मात्र सध्या कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. 1 ते 5 रुपये असा दर सध्या कांद्याला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यातील अनेक शेतकरी हा कांदा परंडा येथील बाजार पेठेत घेऊन जात आहे. मात्र आवक जास्त असल्यामुळे दरात मोठा फरक पडल्याचे दिसत आहे. परंडा येथे दर कमी मिळत असल्यामुळे शेतकरी सोलापूर येथील बाजारपेठेत कांदा मोठ्या प्रमाणात घेऊन जात असताना दिसत आहे.