श्वानाचे निधन झाल्याने संपूर्ण गावकऱ्यांनी फोडला टाहो, श्वानाच्या नावाने बांधणार स्मारक ….

नाशिक | आजवर तुम्ही श्वानाचे अनेक वेगवेगळे किस्से ऐकले असतील. हे श्वान आपल्या जीवाची बाजी लावून नेहमीच आपल्या मालकाचे रक्षण करतात. अशात जर कोणी संशयास्पद व्यक्ती आढळला तर तो श्वानाच्या तावडीतून कधीच सुटत नाही. मात्र आपण रस्त्यावर अनेक श्वान पाहतो. अनेकजण त्यांना घाबरतात देखील. मात्र मिळेल ते खाऊन हे श्वान आपल्या मालकाची सेवा करतात. श्वान हा एक इमानी प्राणी आहे. मात्र तुम्ही श्वानाचे स्मारक पाहिले आहे का?
हो श्वानाचे स्मारक, आणि हे स्मारक कोणत्या एका व्यक्तीने नाही तर संपूर्ण गावकऱ्यांनी बांधले आहे. नाशिक तालुक्यातील पळशे गावात हा पराक्रम होणार आहे. येथील ग्रामस्थांनी त्यांच्या बाराशे नावाच्या श्वानाचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. १२ वर्षांपूर्वी बाराशे नावाचा एक श्वान या गावात आला. बाराशे खूप हुशार होता. त्याने कधीच कुणाला इजा पोहचवली नाही.
तो गावातील प्रत्येक व्यक्तीचा लाडका झाला होता. त्याला कधी भूक लागली तर तो हक्काने कोणत्याही घरी जात होता. एवढेच नाही तर गावात कुणाचे निधन झाले तर त्या वायक्तीच्या अंत्य विधीला बाराशे आधी हजर असायचा. तसेच त्या व्यक्तीच्या दशक्रिया विधीमध्ये देखील तो सहभागी व्हायचा.
त्याने गावात सुरू असलेले हरी पाठ देखील ऐकले आहेत. एकही हरिपाठ त्याने चुकवला नाही. तो एक श्वान होता मात्र तो अगदी एका गावातील मोठ्या पुढाऱ्या प्रमाणे राहत होता. गावात त्याचा एक वेगळाच थाट होता.
काही वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. त्यावेळी संपूर्ण गावाने टाहो फोडला. बाराशे आपल्यात नाही ही कल्पना या गावकऱ्यांना सहन झाली नाही. त्यांनी सर्व विधी पूर्ण करत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर या गावकऱ्यांनी एकत्र येत बाराशेच्या नावाचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला. गावातील पुढील पिढीला श्वान आणि त्यांचा लळा लागावा तसेच माणुसकी काय असते हे समजावे म्हणून सगळ्यांनी हा निर्णय घेतला.
आता या सगळ्यात तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या श्वानाचे नाव बाराशे का ठेवले असेल. तर त्याची देखील एक मस्त कहाणी आहे. काही वर्षांपूर्वी गावातील एका गाडी खाली श्वानाचं एक छोटं पिल्लू आलं होतं. त्यावेळी गाडीत गावातील बऱ्याच व्यक्ती होत्या. त्यांनी त्याला प्राण्यांच्या रुग्णालयात नेले. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.
यावेळी डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केला तेव्हा एकूण १२०० एवढा बिल झाला होता. गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून हे पैसे भरले. मग तेव्हा पासून त्याला बाराशे हे नाव पडले.