अवघ्या 6 महिन्यात नवविवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; कारण जाणून धक्काच बसेल

पुणे | पुण्यातील विवाहित महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. नुकतेच एका नवविवाहित मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मुलीच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली असून सर्व सासरची मंडळी फरार आहेत.
दर्शना प्रशांत पवार असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित तरुणीचे नाव आहे. तिचे वय फक्त 24 वर्ष होते. बालाजी नगर, कात्रज, पुणे येथे ती राहत होती. अकोला जिल्ह्याच्या बोरगाव मंजू येथील यावल खेड येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून मुलीच्या सासरच्या मंडळींचा शोध घेत आहेत.
मंगला अरुण साळुंके यांनी दर्शनाच्या आत्महत्येच्या संदर्भात तक्रार नोंदवली आहे. त्यांनी सांगितले की, 6 फेब्रुवारी 2022 रोजी दर्शनाचे प्रशांत रामकृष्ण पवार (शेगाव जिल्हा बुलढाणा, ह.मु. बालाजी नगर कात्रज पुणे) याच्याबरोबर विवाह झाला होता. लग्नामध्ये मुलीच्या आई-वडिलांनी 4 लाख 50 हजार किमतीच्या भेटवस्तू सासरच्या मंडळींना दिल्या.
तसेच मुलीला सोन्या-चांदीने मढवले. लग्न झाल्यानंतर दर्शना तिच्या पतीबरोबर पुण्याला राहायला आली. यावेळी तिचे सासरे आणि सासू असे चार मंडळी पुण्यातील घरात राहत होते. रामकृष्ण असे तिच्या सासऱ्यांचे नाव असून ते पुण्यातील पोस्टामध्ये कार्यरत आहेत. तर मुलगा हा पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. दर्शनाच्या सासूचे नाव नंदा पवार असे आहे.
लग्नानंतर काही दिवस सुखी संसार झाला. त्यानंतर मार्च महिन्यात दर्शनाचा खूप छळ सुरू झाला. तिचा पती आणि सासू सासरे तिला मानसिक त्रास देऊ लागले. तुझ्या आई वडिलांनी पाहुण्यांसाठी काहीच केले नाही. अतिशय निकृष्ट दर्जाच्या भेटवस्तू दिल्या. पाहुण्यांची फार अबाळ झाली.
असे ते सतत तिला बोलत होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी दर्शनाला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी एक दिवस दर्शना माहेरी निघून आली होती. तिच्या पतीने दीड लाख रुपयांची मागणी केली होती. दर्शनाच्या आई-बाबांनी कसेबसे दीड लाख रुपये जमवून तिला दिले. यावेळी दर्शनाने आई-वडिलांना होणारा सर्व त्रास सांगितला होता. त्यावेळी आई-बाबांनी आपल्या मुलीचीच समजूत काढली. ते लोक चांगले आहेत त्यांना काही गरज लागत असेल त्यामुळे ते पैसे मागत असतील. असे ते तिला म्हणाले. तसेच सुखाने संसार करण्याचा आशीर्वाद देत तिला पुन्हा सासरी पाठवले.
मात्र सासरच्या मंडळींचा हा त्रास कमी होत नव्हता. त्यांनी पुन्हा एकदा तिच्याकडे आणखीन पैशांची मागणी केली. यावेळी पुन्हा एकदा ती तिच्या माहेरी निघून आली. तसेच तिने पुन्हा न जाण्याचा हट्ट केला. यावलखेड येथे ती तिच्या माहेरी आली होती. पुन्हा एकदा दर्शनाने आई-वडिलांना तिला होणारा अमानुष त्रास सांगितला. 18 ऑगस्ट रोजी तिच्या पतीचा तिला फोन आला होता. यावेळी त्याने सांगितले की, पैसे घेऊन यायचे नसेल तर येऊ नको मी दुसरे लग्न करत आहे. हे ऐकून दर्शना पूर्णता खचून गेली. एवढा सर्व अट्टहास कशासाठी केला असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला.
यात सर्व चिंतेमध्ये तिने स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. माहेरीच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. 19 ऑगस्ट रोजी ती घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या आई-वडिलांनी बोरगाव मंजू येथील पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींनी आत्महत्या केल्याची तक्रार दाखल केलेली आहे. पोलीस सध्या सासरच्या मंडळींचा शोध घेत आहेत.