भारतातील पारंपरिक लोकप्रिय खेळ,ज्यांनी नटलयं आपलं बालपण..

मुंबई | सध्याची युवा पिढी आणि बालपण हे सोशल मीडिया,ॲपल आणि अँड्रॉइड फोनमध्ये गुंतलेलं आहे. याहून पलीकडे काही वर्षांपूर्वीच्या मुलांचं बालपण पाहिलं तर ते पारंपरिक खेळ आणि मज्जा मस्तीमध्ये रमलेलं होतं. ऊन,पाऊस, हिवाळा कुठल्याही ऋतूमध्ये मैदान गाठायचं आणि पारंपरिक खेळांचा आनंद घ्यायचा. मोबाईल आणि कंप्युटरवर गेम खेळताना डोळ्यांना वेदना होतात तसेच पाठीचा त्रास देखील होतो. याउलट मातीतील खेळ खेळताना मुलं आणखी मजबूत व्हायची. काय लागलं कुठे लागलं त्यांना याची जाणीव देखील होत नसे. आता हे बालपण कुठेतरी हरवल्यासारखं वाटत आहे. पारंपरिक खेळ खेळणं हा त्या काळातील मुलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग होता. आता मोबाईल, पीसी आणि गॅजेट्सच्या काळात पारंपरिक खेळ कुठेतरी लुप्त होताना दिसत आहेत. चला तर पाहूया ५ असे पारंपरिक भारतीय खेळ ज्याचा तुम्ही आम्ही एकदा तरी आनंद घेतला असेल.
१) गोट्या/ कंचा
बालपणी हा खेळ प्रत्येकाने एकदा तरी खेळलाच असेल. गोट्या या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळ खेळण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. काही रुपये खर्च करताच गोट्या/ कंचा बाजारात मिळत असे. खेळाचा नियम अगदी सोपा होता, जमिनीवर एक वर्तुळ तयार केला जातो. त्यात सर्व गोट्या/ कंचा सजवल्या जायच्या. एक खेळाडू डाव्या हाताच्या तर्जनीचा वापर करत वर्तुळात असलेल्या कंचावर निशाणा साधतो. त्याचा निशाणा जर योग्य ठिकाणी लागला तर विजेता खेळाडू पराभूत झालेल्या खेळाडूकडून सर्व कंचा काढून घेतो.
२) विट्टी दांडू :
विट्टी दांडू या खेळाला जवळ जवळ २५०० वर्षांचा इतिहास आहे. हा प्राचीन भारतीय खेळ खेळण्यासाठी दोन काठ्या आणि अंडाकृती आकाराच्या लाकडी तुकड्याची आवश्यकता असते. लांब लाकडीच्या भागाला दांडू म्हणातात. तर अंडाकृती आकाराच्या भागाला विट्टी असे म्हणतात. विट्टी वरच्या टोकाला मारण्यासाठी खेळाडूला दांडाचा वापर करावा लागतो, ज्यामुळे तो हवेत उडतो. विट्टी हवेत असताना खेळाडू शक्यतोवर गिलीला मारतो.
३) भोवरा :
भोवरा हा खेळ देखील बालपणी खूप खेळाला जायचं. बालपणी बाजारात ५ ते १० रुपयांना भोवरा मिळायचा. शंखाच्या आकाराचा भोवरा आणि त्यासोबत दोरी किंवा गुंडाळण्यासाठी जाळी. दोरी भोवराच्या सभोवताली गुंडाळायची, त्याचे एक गाठ मारलेले टोक हातात धरून तो जमिनीवर झटक्याने फेकायचा. जमिनीवर पडताच तो गिरकी घेत फिरायला लागतो. आधी लाकडाचे भोवरे मिळायचे. आता प्लास्टिक आणि फायबरमध्ये उपलब्ध आहेत. भोवरा हा खेळ चीन आणि जपानमध्ये खेळला जात असला तरी हा मूळचा भारतीय खेळ आहे. ज्याच्यावर डाव येईल त्याचा भोवरा रिंगणात मांडतात. बाकीचे खेळाडू त्या भोवऱ्याला आपल्या भोवऱ्याने गुच्चे मारतात.
४) डब्बा ऐसपैस:
डब्बा ऐसपैस हा एकप्रकारे लपाछपीचा खेळ असतो. मात्र या लपाछपीत डब्ब्याचा वापर केला जातो. ५- ६ किंवा त्याहून अधिक खेळाडू हा खेळ खेळू शकतात. या खेळाबद्दल बोलायचं झालं तर आधी डाव कोणावर येणार ते ठरवलं जातं. नंतर जमिनीवर एक गोलाकार रिंगण आखलं जातं. नंतर एक खेळाडू डबा लांब फेकतो. डाव असलेल्या खेळाडूला तो डबा शोधून आणून रिंगणात ठेवावा लागतो. तोपर्यंत सर्व खेळाडू लपतात. डाव असणाऱ्या खेळाडूला त्यांना शोधावं लागतं. डाव असणाऱ्या खेळाडूने कोणाला शोधलं तर तो डब्बा ऐसपैस असं म्हणतो. याप्रकारे सर्व खेळाडू बाद होईपर्यंत खेळ सुरू राहतो.
५) कांदा फोडी :
हा एक गमतीदार खेळ आहे, या खेळाची गंमत म्हणजे कितीही खेळाडू हा खेळ खेळू शकतात. तो उंच उडी मारू शकतो तो या खेळात सरस असतो. ज्याच्यावर डाव येईल तो खेळाडू पाय पसरून बसतो आणि इतर खेळाडू त्याचा पाय ओलांडून जातात. एकावर एक ठेवलेल्या पायाला ओलांडणारा खेळाडू त्याच्या पायाने स्पर्श करतो. त्यालाच कांडफोडी असे म्हणतात. दुसरी तिसरी फेरी कोणीही सहजरित्या ओलांडतो. मात्र जेव्हा मनोरा उंच उंच जातो त्यावेळी खरी मजा येते.
यापैकी तुमचा आवडता खेळ कुठला? कमेंट करून नक्की कळवा..