मराठी सिनेसृष्टी हादरली! प्रसिद्ध विनोदी कलाकार काळाच्या पडद्याआड ..

मुंबई|मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आपल्या अभिनयाने सर्वांचे अविरतपणे मनोरंजन करणारे आणि खळखळून हसवणारे अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
गोरेगाव येथील राहत्या घरी अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी कुटुंबीय खूप घाबरले होते. त्यामुळे डॉक्टरांना घरी बोलावण्यात आले. डॉक्टरांनी घरी येऊन जेव्हा प्रदीप यांना तपासले तेव्हा त्यांनी ते आपल्यात नाहीत असे सांगितले. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वात दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या निधनानंतर अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींनी सोशल मीडिया मार्फत शोक व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनानंतर एक ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. प्रदीप पटवर्धन हे एक असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी फक्त आपल्या अभिनयाने नाही तर आपल्या स्वभावाने देखील मोठा चाहतावर्ग गोळा केला होता.
आज जरी ते आपल्यामध्ये नसले तरी देखील त्यांनी या मराठी सिनेसृष्टीला दिलेल्या चित्रपटांमधून ते कायमच अजरामर राहणार आहेत. मोरूची मावशी हे त्यांचे सर्वाधिक गाजलेलं नाटक होतं. या नाटकातील अभिनयासाठी त्यांना आज देखील ओळखले जाते. प्रदीप पटवर्धन यांनी अभिनयाच्या कारकीर्दीत अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्याचबरोबर त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ, चष्मे बहाद्दर, डान्स पार्टी, गोळा बेरीज, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशा बहुसंख्य चित्रपटांमध्ये त्यांच्या दमदार अभिनयाचे दर्शन घडले.
यासह त्यांनी परीस, थँक्यू विठ्ठला, जर्नी प्रेमाची, शोध, पोलीस लाईन एक सत्य अशा काही चित्रपटांसाठी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. अभिनय क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि त्यांचा वचक हा फार मोठा होता. त्यांच्या निधनाने मराठी अभिनय क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक कलाकारांचे निधन होत असल्याचे दिसत आहे. लता मंगेशकर यांच्यासारख्या गाणं कोकिळा देखील आपल्याला सोडून गेल्या. तसेच अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी या जगाचा निरोप घेतला.