पदरी एक मूल आणि सासरच्या छळातून होरपळून निघालेल्या शिवांगीने UPSC परीक्षेत मिळवला १७७ वा रँक

मुंबई | संघर्षाला हवी साथ असं म्हणतात. आपलं कुटुंब आपल्या पाठीशी उभं असलं की, आपण सारं जग जिंकू शकतो. अशीच साथ शिवांगी गोयलला देखील मिळाली. आणि ती UPSC परीक्षेत घवघवीत यशाची मानकरी ठरली. मात्र इथ पर्यंतचा तिचा प्रवास तितकासा सोप्पा नव्हता.
लग्न झालं, पदरी एक कन्यारत्न, अशात सासरच्या मंडळींकडून जाच या सर्वांवर मात करत आज तिने UPSC मध्ये १७७ वा रँक मिळवला आहे. शिवांगी उत्तरप्रदेशच्या हाडपू येथील पिलखुवा येथे राहते. अथक परिश्रमाने तिने मिळवलेल्या यशाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. अशात तिच्या या विजयाने तिच्या कुटुंबीयांची आणि संपूर्ण जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. मध्यामांशी बोलताना शिवांगी सांगते की, ” मी जेव्हा शाळेत शिकत होते तेव्हा तेथील मुख्याध्यापक मला नेहमी सांगायचे की, तू खूप शिक आणि आयएएस अधिकारी हो. त्यावेळी मला देखील असंच काही करावं असं वाटायचं.
मात्र शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिल्ली येथील लेडी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात मला ॲडमिशन मिळालं. त्यानंतर लवकरच माझं लग्न देखील झालं. लग्नानंतर मला एक मुलगी झाली. माझ्या मुलीचं नाव रैना आहे. ती आता ७ वर्षांची आहे. लग्नानंतर थोडे दिवस माझं आयुष्य ठीक चाललं होतं. मात्र नंतर माझ्या सासरच्या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. ते माझा खूप छळ करत होते.
त्यामुळे माझे बाबा मला पुन्हा आपल्या घरी घेऊन आले. आणि त्यांनी मला सांगितलं की, तुला तुझ्या आयष्यात जे करायचं आहे ते तू कर. तुझ्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. माझ्या वडिलांनी मला जो धीर दिला त्यामुळे पुन्हा एकदा आयएएस साठी तयारी करावी असं मला वाटू लागलं.” शिवांगीने लग्नाआधी देखील एकदा MPSC ची परीक्षा दिली होती. मात्र तेव्हा तिला अपयश आलं होतं. माहेरी परत आल्या नंतर देखील तिला या परीक्षेत पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. मात्र तिसऱ्या प्रयत्नात तिचं नशीब उजळून निघालं.
आता तीच आयएएस अधिकारी व्हायचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या सर्वांचं श्रेय तिने आपल्या आई वडिलांना आणि आपल्या मुलीला दिलं आहे. या सर्वांनी तिला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मदत केली असं तिचं म्हणणं आहे.