दुःखद बातमी! एका ऑपरेशन दरम्यान २३ वर्षीय जवान शहीद

जम्मूकाश्मीर |भारतीय सैन्य दलातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीरच्या लेहमध्ये एका भारतीय जवानाला वीर मरण आल आहे. सुरज शेळके असं वीर जवानांचे नाव होतं. सातारा जिल्ह्यातील खटाव या गावचे ते रहिवासी होते. त्यांच्या निधनाने गावामध्ये आता शोककळा पसरली आहे.
सुरज शेळके अवघ्या 23 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि छोटा भाऊ असा परिवार आहे. तीन वर्षांपूर्वी सुरज शेळके हे सैन्यामध्ये भरती झाले होते. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच लेह-लडाखमध्ये पोस्टिंग मिळाली. त्यानंतर भारत मातेच्या सेवेसाठी ते तैनात झाले.
लेहमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन ‘रक्षक’ मध्ये त्यांना वीर मरण आलं आहे. रक्षक या ऑपरेशनमध्ये मोहीम सुरू असताना दुश्मनांकडून त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यामुळे ते धारातीर्थी पडले. घरातील मोठ्या मुलाच्या निधनामुळे शेळके कुटुंबीयांना शोक अनावर झाला आहे.
सातारा जिल्ह्याची भारत मातेच्या सेवेसाठीची एक वेगळी पार्श्वभूमी आहे. या जिल्ह्यातील अनेक गावांमधील तरुण देशसेवेसाठी प्राणांची आहुती देत असतात. तसेच अनेक जवान अजूनही सैन्यामध्ये भरती होण्यासाठी
शिक्षण आणि ट्रेनिंग घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी लष्कराचे एक वाहन शोख्य नदित पडले होते. त्यावेळी या अपघातात एकूण सात जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये साताऱ्यातील देखील एका जवानाचा मृत्यू झाला.
सातारा जिल्ह्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचं या अपघातात निधन झालं.
या घटनेनंतर सातारा जिल्ह्यावर जून महिन्याच्या सुरुवातीस आणखीन एक घटना घडली. खटाव तालुक्यातील भुरकवडीचे सुपुत्र जवान संग्राम फडतरे यांनादेखील लेहमध्ये वीर मरण आले. अशात आता खटाव तालुक्याने आणखीन एका जवानाला गमावल आहे. त्यामुळे संपूर्ण गावात आणि जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सातारा जिल्ह्याला वीर जवानांचा एक वेगळा इतिहास आहे. या जिल्ह्यातील अनेक तरूण दरवर्षी लष्करात भरती होत असतात. आपलं जीवन हे त्यांना भारत मातेच्या सेवेमध्ये घालवायचं असतं. या जवानांचे कुटुंबिय या देखील त्यांना या कार्यात कधीच अडवत नाहीत. या जिल्ह्यात प्रत्येक घरातून एक तरी मुलगा लष्करात सेवा देत आहे.