दुःखद! सख्या भावंडांच्या मृत्युने ऊस तोडी कामगारांच्या कुटुंबावर पसरला दुःखाचा डोंगर

हिंगोली: खेळत असताना दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू तळ्यात बुडून झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. एकाच घरातील दोन चिमुरड्यांचा मृत्यू ही घटना मनाला चटका लावणारी आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये असणारे बोरखेडी पिंगाळे या ठिकाणी ही घटना घडली आहे.
श्रावण आश्रम चव्हाण यांचा मुलगा आणि मुलगी या दोघांच्या मृत्यूमुळे गावात शोकांतिका पसरली आहे. सध्या ऊस तोडीचा सीजन आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील बरीच कुटुंबे हे ऊस तोडण्यासाठी, पोट भरण्यासाठी गावोगावी फिरत असतात. हिंगोली जिल्ह्यातील बरीच कुटुंबे हे करमाळा तालुक्यात ऊस तोडी करण्यासाठी आली होती. त्यांच्यासोबत त्यांची लहान लेकरे सुद्धा होती. ऊस तोडणीचे काम चालू असतानाच या कुटुंबावर काळाने घाला घातला. ऊस तोडीचे कामगार हे ऊस तोडून त्यांची गाडी भरण्याचे काम चालू होते.
या ऊस तोडी कामगारांची लहान लहान लेकरे आजूबाजूला खेळत होती. शेजारीच एक शेततळे सुद्धा होते. लहान लेकरे खेळत असताना या शेततळ्याशेजारी आले. खेळत असताना प्रतीक्षा चव्हाण ही शेततळ्यात पाय घसरून पडली. तिच्या पाठोपाठ तिचा लहान असणारा भाऊ सुद्धा पाण्यात पडला. प्रतीक्षा चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रविवारी ही घटना घडली. पाण्यातून बाहेर काढल्यांनतर प्रतीक्षा चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांनाही करमाळा येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. परंतु उपचार करण्यापूर्वी त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. प्रतीक्षा चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांचे पोस्टमार्टम करून त्यांना त्यांच्या गावी बोरखेडी येथे नेण्यात आल. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.