निवडणुकीसाठी सुनेचा बळी, 5 लाखांची रक्कम न दिल्याने सुनेला केली जबर मारहाण, त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

अमरावती | अनेक गावांमध्ये आता पंचायत समितीच्या निवडणुका सुरू होणार आहेत. अशात याच निवडणुकीसाठी माहेरून पैसे आणले नाही म्हणून एका महिलेचा सासरच्या मंडळींनी अतोनात छळ केला. यात या महिलेने स्वतःचे जीवन संपवले आहे. तिला सतत शारीरिक आणि मानसिक त्रास होत होता त्यामुळे या जाचाला कंटाळून तिने हे गंभीर पाऊल उचलले आहे. आता या प्रकरणी तिच्या सासरच्या मंडळींना ताब्यात घेण्याच्या मागे पोलीस कार्य सुरू आहे.
जयश्री नागे असे आत्महत्या केलेल्या महीलीचे नाव आहे. गेल्याच वर्षी तिचे लग्न झाले होते. पती आशिष वसंतराव नागे याच्या बरोबर तिचे कुटुंबियांच्या संमतीने लग्न लावून दिले गेले. 26 एप्रिल 2021 मध्ये या दोघांचे लग्न झाले. आशिषचा गावातच एक व्यवसाय आहे. अमरावती येथील तिचे सासरे हे राजकीय विश्वातील आहेत. ते वंचित बहुजन आघाडीच्या पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत. तसेच अकोला पंचायत समितीचे माजी सभापती देखील राहिले आहेत. वसंत नागे असे त्यांचे नाव आहे. तर सासू शोभा आणि नणंद जयश्री खराटे दिर नितीन नागे ही मृत महिलेच्या सासरची मंडळी आहेत. हे सर्व जण टवलार, अचलपूर, जी. अमरावती येथील रहिवासी आहेत.
मयत जयश्रीच्या आत्महत्येनंतर तिच्या माहेरील नंदा रामदास साबळे 45 ( मांजरी अकोला) यांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीसाठी जयश्रीला तिचा पती आणि सासरच्या व्यक्तींनी 5 लाख रुपये मागितले होते. हे पैसे तिला तिच्या माहेरच्या व्यक्तिंकडून घेऊन येण्यास सांगितले होते. मात्र माहेरी गरीबी असल्याने तिच्या आई बाबांनी तिला कसे बसे 2 लाख 50 हजार रुपये दिले. यावर तिचा पती खूप रागावला. त्याने पुन्हा तिला मारहाण केली. तसेच घरातील इतर व्यक्तींनी तिला खूप शिवीगाळ केली.
काही दिवसांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला होता. यात तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला. तसेच मुलगी झाली म्हणून तिचा खूप छळ केला गेला. हा सर्व त्रास ती सहन करत होती. मात्र सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा माहेरी 2 लाख 50 हजार रुपये आणण्यासाठी पाठवले. यावेळी मुलीला काहीच समजत नव्हते. कारण घरी आई बाबा खूप गरिबीत दिवस काढत होते.
जेव्हा ती माहेरी गेली तेव्हा तिच्या पतीने तिला फोन करून खूप शिवीगाळ केली. तसेच पैसे घेऊन आली नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली. या सर्व जाचाला कंटाळून तिने शेवटी आत्महत्या केली आहे. तिच्या निधनसाठी तिच्या सासरची मंडळी जबबादर असल्याचे अनेक पुरावे तिने एक पेनड्राईवमध्ये सोडले आहेत. हा पुरावा देखील पोलिसांना दिला गेला आहे. आता पोलीस पुढील कारवाई करत आहेत.