इतर

डोळ्यादेखत वडिलांनी पाहिला मुलीचा मृत्यू; हृदयद्रावक घटना बघुन तुमच्या डोळयात पाणी येईल

औरंगाबाद| सहज म्हणून एखाद्या कामासाठी बाहेर जाणारं माणूस सुरक्षितपणे घरी येईल की नाही अशी भीती अनेकदा वाटत असते. कधी ही केवळ भीती राहते तर कधी मनातली हीच भीती खरी ठरते आणि संसारच उध्वस्त होतो. अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली. आधार नोंदणी करण्यासाठी दुचाकीवरून गेलेले बाप लेक घरी परतलेच नाहीत. रस्ते अपघातात डोळयादेखत मुलीचा मृत्यू पाहणाऱ्या बापानेही जीव सोडला.

औरंगाबाद जिल्ह्यातील खेर्डा गावातील सतिश शिंदे वय ३२ आणि त्यांची सहा वर्षाची मुलगी गायत्री उर्फ बबली या बापमुलीच्या बाबतीत ही हृदयद्रावक घटना घडली. पैठण पाचोड रोडवरील डावा कालवा पुलाजवळ सतीश यांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. याच अपघातात सतीश आणि गायत्री यांना जीव गमावण्याची वेळ नियतीने आणली.

मुलगी गायत्रीसोबत सतीश आधार कार्ड काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी पैठण येथे गेले होते. काम आटोपून गावाकडे परत जात असताना त्यांच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली आणि त्यातच त्यांच्या जीवनाचा अंत झाला. सतीश आणि गायत्री यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची वार्ता खेर्डा गावात समजताच सारं गाव सुन्नं झालं आहे.

गायत्री आता सहा वर्षाची झाल्याने तिच्या शाळा प्रवेशासाठी आधारकार्डची गरज होती. आधारकार्ड काढण्यासाठी मुलगी गायत्रीसोबत जाण्याचा सतीश यांनी निर्णय घेतला. दोघेही दुचाकीवरून गेले आणि परत येत असताना त्यांच्यावर नियतीने घाव घातला. घरी पोहोचण्याआधीच् या बापलेकीला मृत्यूने गाठले. आधारकार्ड घेऊन घरी येण्याआधीच शिंदे कुटुंब निराधार बनले.

हा अपघात इतका भीषण होता की या धडकेमध्ये गायत्री उडून दूर अंतरावर फेकली गेली. ती उडून पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. गायत्री अखेरचा श्वास घेत असताना गंभीर जखमी झालेल्या सतीश यांनी पाहिले मात्र ते काहीच करू शकत नव्हते. जखमी अवस्थेतील सतीश यांना नागरीक व पोलीसांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान सतीश यांचाही अंत झाला.

दरम्यान, पाचोड पैठण या रस्त्यावरील डावा पुलाच्या परिसरात गेल्या काही महिन्यात वारंवार अपघात होत आहेत. याबाबत उपाय करावेत अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. या घटनेची नोंद पैठण पोलीसठाण्यात करण्यात आली आहे. अपघाताच्या घटनेतील आयशर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे. मात्र हकनाक बळी गेलेल्या बापलेकींच्या आठवणीने खेर्डातील गावकऱ्यांच्या डोळ्यांना अश्रूंचा पूर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close