पंजाबच्या आणखीन एका गायकाला जिवे मारण्याची आली धमकी….

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू सिंह मुसेवालाच्या हत्येनंतर अनेक कलाकारांना जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काही दिवसांपूर्वीच मिका सिंगला देखील अशी धमकी आली होती. त्यावेळी त्याने पोलिसांमध्ये तक्रार केली होती. तसेच त्याला आलेला धमकीचा मेल त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
ही सर्व घटना पाहून चाहते आणखीनच चिंतेत पडले होते. अशात आता पुन्हा एकदा एका गायकाला धमकीचे फोन येऊ लागले आहेत. त्यामुळे या गायकाने देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. जानी जोहान असे या गायकाचे नाव असून त्याने पंजाबी सिने सृष्टीसाठी अनेक प्रसिद्ध गाणी गायली आहेत.
त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. मात्र त्याला देखील आता सिद्धू सिंग मुसेवाला प्रमाणे हत्या करणार अशी धमकी येत आहे. त्यामुळे हा गायक खूप भयभीत झाला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना या गायकाने पत्र लिहून ही माहिती कळवली आहे. तसेच त्याने मुख्यमंत्र्यांकडे संरक्षणाची मागणी देखील केली आहे. या पत्रात, गायकाने दावा केला आहे की त्याला गुंडांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत आणि पंजाबचे मुख्यमंत्री, एडीजीपी आणि एसएसपी मोहाली यांना त्यांची सुरक्षा वाढवण्याची विनंती केली आहे.
तितली आणि बिजली अशा दोन्ही प्रसिद्ध गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जानी जोहानने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, ” मला आणि माझे व्यवस्थापक दिलराज सिंग नंदा यांना जिवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहे. यापूर्वी आम्ही एसपी मोहाली, राज्य प्रशासन, एसएएस नगर (मोहाली) यांच्याशीही चर्चा केली होती. मात्र आता मला तुमच्याकडून सुरक्षा हवी आहे. ”
पुढे त्याने लिहिले आहे की, ” या सर्व धमक्यांमुळे मी माझ्या कुटुंबीयांना आधीच परदेशी पाठवले आहे. मी आणि माझे व्यवस्थापक या धमक्यांमुळे खूप मानसिक तणावात जगत आहोत. बऱ्याच ठिकाणी माझे शो आहेत. मात्र हे मैदानी शो करत असताना माझ्या मनात जीव जाण्याची खूप मोठी भीती आहे.” गायक त्याला येत असलेल्या धमक्यांमुळे पूर्णता भयभीत झाला आहे. त्याची प्रसिद्धी आणि त्याचा आवाज ऐकण्यासाठी पंजाबमध्ये त्याचे असंख्य चाहते आहेत. तसेच त्याने बऱ्याच शोचे साइन देखील केले आहे. मात्र भीती पोटी तो बरेचसे शो रद्द देखील करत आहे.